#गार्गीचाबाप्पा
#गौरीपूजन
गौरी.. सुखाचे आनंदनिधान
यावर्षी आमच्या छोट्या गौराईने खूप आनंदाने आणि प्रेमाने ज्येष्ठा कनिष्ठांचे स्वागत केले.. अखंड प्रश्न, खूप उत्साह, नटण्या-मुरडण्याची हौस.. तिच्यामुळे हा सोहळा साजरा झाला.. आत्या-काकाच्या मदतीने तिच्या आवडीची आरास मांडून, सतत सगळ्यांकडे लक्ष ठेवत ती घरात बागडत होती. आपल्या सणांबद्दल, दैवतांबद्दल जाणून घेण्याची, प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्याची तिची इच्छा.. हे काहीतरी विशेष आहे, आपलं आहे ही जाणीव.. सगळ्या गोष्टी मला सतत हे जाणवून देतात की रोपटं रुजतंय, आता खरी मशागतीची गरज आहे.
तिच्या प्रश्नांना उत्तर देताना कित्येकदा मी निरुत्तर होते. अश्यावेळी तिच, "अगं आजीला माहिती असेल ना" असं म्हणते आणि स्वारी आजीकडे मोर्चा वळवते.. मग तेव्हा आजी आजोबांकडून KT घेतली जाते.. हासुद्धा एक खूप निर्मळ क्षण असतो. दुधापेक्षा सायीवर माया जास्त असं का म्हणतात ते कळतं.. आपल्याला सगळ्यातलं सगळं करू द्यायला हवं हा हट्ट आजीकडून पूर्ण करून घेण्यात जे सुख आहे ते आजोबांच्या मांडीवर बसून खडी साखरेचा खडा खाण्यातच असतं.. "मला पोळी करू दे" असं टुमणं लावलं की आईला जरी कणकेने बरबटलेले हात, पसरलेला ओटा दिसत असला तरी आजीच्या डोळ्यात ओतप्रोत कौतुक ओसंडत असतं.. "मी केलेली पोळी खाऊन घ्या" असं म्हणत ही पोर आजोबांच्या मागे लागते तेव्हा हळूच चष्म्याच्या काचांमागचे डोळे पाणवतात.. आजोबांना औषधाची आठवण करून देताना उगा मोठेपणाचा आव आणणाऱ्या तिचा ओरडासुद्धा हसऱ्या चेहर्याने आजोबा ऐकून घेतात तेव्हा आजोबांना तिच्यात आई दिसत असेल का? "आजोबा साखर नका खात जाऊ हो " असं म्हणणाऱ्या तिच्यातला गोडवा साखरेहूनही गोड लागतो.. आजी जेव्हा तिची बाजू घेऊन लाडक्या काकाला सुद्धा ओरडते तेव्हा त्याला वाकुल्या दाखवून ती हसली की आख्खं घर हसतं..
मेंदी लावलेले हात, पावलागणिक घुमणारा पैजणांचा छुमछुम आवाज, तिच्या हसऱ्या आवाजातल्या कानगप्पा.. मखरात बसलेली गौराई हळुवार प्रसन्न हसल्याचा भास होतो.. शेवटी तीपण घरातली लेकच की.. सात्विक डोळ्यांनी सगळं बघून भरून पावते ती! असंच माझं माहेर सुखा-समाधानाने भरलेलं राहू दे असा आशीर्वाद देते ती! आणि मी भरलेले डोळे आणि भारलेलं मन घेऊन गौराईच्या दोन्ही रूपांपुढे नतमस्तक होते ..
पूजा, व्रतं, सण-समारंभ या सगळ्यांना घरातल्या लहानग्यांमुळे किती शोभा येते ना!! त्यांच्या फक्त घरात वावरण्यामुळे, असण्यामुळे साध्या समारंभांचे सुद्धा सोहळे होतात.. छोटे बाप्पा आणि गौराई आपल्या आजूबाजूला असल्याने घरात गोकुळ नांदते!! "गौरी आली, धनधान्याच्या पावलांनी, सुख समाधानाच्या पावलांनी, लेकरा बाळाच्या पावलांनी" असं म्हणताना हेच तर मागणं मागतो आपण तिच्याकडे.. माझ्या घरात, माझ्या गौराईच्या पावलांनी अखंड सुख नांदू दे!
सगळ्या घरांमध्ये असंच सुखाचं गोकुळ नांदतं-गाजतं राहू दे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना!
- © स्वाती अत्रे