Thursday 18 May 2017

(अ)सुर निरागस हो!!!

© Swati Atre
(Copyrighted. Please fwd aling with the original writer's name)

(अ)सुर निरागस हो!!!

(हा प्रसंग पुर्णत: वैयक्तिक असून कुठल्याही प्रकारचे साधर्म्य आढळल्यास आम्ही आपल्या दुः खात सहभागी आहोत!!)

साधारणत: रात्रीचे ११.३० झालेले असतात. मातृदिन संपत आलेला असतो. दिवसभर आलेल्या विविध पोस्टस्, मॅसेजेस् वाचून आई झाल्याबद्दल कृतकृत्य का काय ते वाटत असतं. मांडीवर निद्रीस्त झालेल्या पिल्लाचे चटाचटा मुके घ्यावेसे वाटत असतात (पण नको! उठलं तर काय घ्या) माझ्यामधली रॅशनल आई ईमोशनल आईला समजावते.

~© Swati Atre~

आणि आता निवांत झोपू अश्या आनंदात असतानाच शेजारी शेषशायी झालेल्या नारायणाचा फोन वाजायला लागतो. तो फोन शोधून आवाज बंद करेपर्यंत, देवाघरचं फुल असलेलं माझं मुल झोपेतून उठून, माझ्याकडे टकामका पाहात बसलेलं असतं. माझ्या घश्याला कोरड पडते, स्वतःचं भविष्य (रात्रीपुरतं का होईना) अंधःकारमय दिसू लागतं. मदतीसाठी शेजारी पहावं तर तिकडून निरामय, निर्विकार अशी समाधी लागलेली असते आणि माझा परतीचे सगळे दोर कापले गेलेला सुर्याजी झालेला असतो.

रात्रीचे (की माझे??) १२ वाजलेले असतात. बाळ खेळायच्या मुडात असते. "झोपेल ५-१० मिनिटात" असं स्वतःला समजावत मी उसन्या उत्साहाने, "अगं माझं सोनं ते" करायला लागते. बाळ आनंदाने उड्या मार, इकडून तिकडे लोळ, पांघरुणात घुसून भॉ कर असे बालसुलभ प्रकार सुरू करते आणि मला घड्याळ दिसेनासे होते..

१२ चे १२.३० आणि १२.३० चा १ होतो आणि माझा उसना उत्साह संपू लागतो. "चला आता झोपायचं किनई" पासून "झोप की कार्टे" पर्यंतचा प्रवास फार लवकर पार होतो आणि पाठीवरच्या थापटीचे धपाट्यात रुपांतर होऊ लागते. पण माझ्याच पोटचं असल्याने बाळ डगमगत नाही. आता ते गनिमी कावा करतं. (वाचा अजून शिवचरीत्र!!!) शांतपणे डोळे मिटून घेतले जातात. आईरूपी गनिम निवांत होतो आणि पाठ टेकतो. बरोबर १० मिनिटांनी दुसरा हल्ला होतो. यावेळी बाळकृष्ण कालियामर्दन लिला दाखवतो आणि माझ्या पोटावर दणादण उड्या मारल्या जातात, नाक, कान, डोळे,केस जे हाताला येईल ते ओरबाडलं जातं आणि अतीव आनंदाचे चित्कार काढले जातात. मी जिजाऊपासून श्यामच्या आईपर्यंत सगळ्या मातांचे चिंतन करून हिंसक विचार दूर सारते आणि बाळाला कुशीत घेण्याचा प्रयत्न करते. पण बाळाच्या प्लॅनिंगनुसार आता संगीत रजनीचा कार्यक्रम असतो. त्यानुसार विविध रागदारीतले सुर आळवायला सुरूवात होते.

~© Swati Atre~

त्या सुरांनी समाधी किंचितशी विचलित झालेले बाबा डोळे किलकिले करून, "अगं तिला भूक लागली असेल" असा सल्ला देऊन कुस बदलतात. पुन्हा एकदा रॅशनल आई ईमोशनल आईला समजावते की 'भूक वगैरे नाही, बाळाला टाईमपास करायचाय' पण 'माँ तो आखिर माँ होती है।' या वचनाला जागून मी दुध गरम, गरमचं कोमट करून ते बाटलीत भरून घेउन येते तर मैफील संपवून गायक बसल्याजागी झोपी गेलेले असतात.

मी हताशपणे एकदा हातातल्या बाटलीकडे आणि एकदा बाळाकडे बघते. श्वासाचादेखील आवाज येणार नाही याची काळजी घेत उरलेल्या जागेत लवंडते तेव्हा घड्याळात २.३० वाजलेले असतात.

यानंतर दहशतीखाली झोपलेली मी साधारणत: दर अर्ध्या पाऊण तासाने उठून बाळ झोपले असल्याची खात्री करून घेत असतानाच सकाळ उजाडते..

ज्या कुणी "मुले देवाचे रूप असतात" वगैरे लिहून ठेवलेय त्यांनी नक्कीच रात्री मुलांना झोपवण्याचं महत्कार्य केलेलं नसणार!!!

© Swati Atre
(Copyrighted. Please fwd aling with the original writer's name)

3 comments: